कडापे देवस्थानातील मंदिरे

Read this page in English

श्री बापुजीबुवा श्री कालिकाई देवस्थान हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात आहे. या देवस्थानच्या कडापे येथील परिसरात खालील मंदिरे आहेत.

मुख्य मंदिर

मुख्य मंदिरात श्री बापुजीबुवा आणि श्री कालिकाई यांच्या मुख्य मुर्ती आहेत. या मुर्ती स्वयंभू आहेत. याशिवाय येथे श्री बहिरिबुवा, श्री खंडोबा, श्री म्हाळसादेवी, श्री बाणाई, श्री भवानी, श्री वाघजाई आणि श्री जरी-मरी यांच्याही मुर्ती आहेत.

कडापे येथील हे मंदिर शिवकालापूर्वीचे असून येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट दिल्याचे उल्लेख आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराच्या नियमित व्यवस्थेसाठी अनुदानही दिल्याचे उल्लेख आहेत.

सुरुवातीला मंदिराची व्यवस्था आणि देखभाल ग्रामस्थांमार्फत केली जात असे. मंदिर आणि परिसराच्या देखभालीसाठी १९६८ मध्ये एक विश्वस्थ मंडळ नेमले गेले.

चांद्रसेनिय कायस्थ प्रभू समाजातील अनेक कुटुंबे श्री बापुजीबुवांना कुलस्वामी आणि श्री कालिकाईला कुलस्वामिनी मानतात व त्यांची आराधना करतात.


राहुटी मंदिर

हे श्री गोसावीबुवांचे मंदिर आहे. येथील मुर्ती स्वयंभू आहे. परंपरेनुसार मुख्य मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी हात-पाय धुवुन या मंदिरात पूजा केली जाते. राहुटी मंदिरात स्त्रियांना प्रवेश निषिद्ध आहे.


श्री शंकर महादेव मंदिर

देवस्थान परिसरात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला हे मंदिर आहे. येथे श्री गणेश, श्री महादेव, श्री भवानीमाता आणि श्री हनुमान यांच्या मुर्ती आहेत.


चांद्रसेनिय कायस्थ प्रभू समाजातील कडापे देवस्थानात नियमितपणे भेट देऊन पूजा-विधी करणार्‍या कुटुंबांची नावे. (आद्याक्षरानुसार)

अधिकारी, आंबेगावकर, बागवडकर, बुधवारकर, देशपांडे, दोंदे, गुप्ते, कारखानीस, खोपकर, कुळकर्णी, मोकाशी, पोतनीस, प्रधान, रणदिवे, सुळे, ताम्हणे, टिपणीस, वैद्य वगैरे.

( वरील यादीमध्ये कोणतेही नाव राहिले असेल तर कृपया कळवावे म्हणजे त्याचा समावेश करता येईल. )