मंदिराचा इतिहास

Read this page in English

कडापे येथील देवस्थानाबाबत जी आख्यायिका सांगितली जाते ती अशी :

oldmandir-bप्राचीन काळी श्री महादेव कैलास पर्वतावर ध्यान करत होते. त्यावेळी त्यांना असे लक्षात आले की त्यांचे भक्त संकटात आहेत. त्यांना आपल्या भक्तांची चिंता वाटू लागली आणि त्यांनी आपल्या भक्तांच्या मदतीला जाण्याचे ठरवले.

श्री महादेव कडापेगाव येथील एका गोठ्यामध्ये शिळेच्या रुपात प्रकट झाले. हा गोठा बापू गवळी या स्थानिक ग्रामस्थाच्या मालकीचा होता.

सकाळी लवकर बापू गवळी आपल्या गोठ्यामध्ये गेला असता त्याला ही शिळा दिसली. त्याना आश्चर्य वाटले. त्याने ही शिळा हलवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती हलवताना त्यातून रक्त वाहू लागले. आश्चर्य आणि भितीने बापू गवळी आपल्या घरी गेला. त्याला काळजी वाटू लागली आणि त्या रात्री तो झोपी गेला.

पहाटे श्री महादेव बापु गवळीच्या स्वप्नात आले. भक्तांच्या कल्याणासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी बापू गवळीच्या गोठ्यात कायमच्या वास्तव्यासाठी आल्याचे श्री महादेवांनी त्याला सांगितले. बापू गवळीला अत्यंत आनंद झाला आणि त्याने हि गोष्ट सकाळी आपल्या बायकोला सांगितली. स्नान झाल्यावर ते दोघेही शेतातील आपल्या गोठ्यात गेले. तेथे त्यांनी त्या शिळेची पूजा केली आणि श्री महादेवांना तेथेच कायमचे वास्तव्य करुन भक्तांचे कल्याण करण्याचे आवाहन केले.

ही घटना कडापे येथील ग्रामस्थांना कळल्यावर त्यांनी श्री महादेवाच्या त्या शिळारुपी पाषाणाला श्री बापुजीबुवा असे संबोधायला सुरुवात केली. कोकणात त्याला श्री बापदेव असेही म्हणतात. बापु गवळी यास श्री महादेवांनी मोक्ष दिला आणि स्वत: तेथे कायमच्या वास्तव्याला आले.

श्री बापुजीबुवांनी श्री कालिकामातेला तेथे येऊन भक्तांचे रक्षण करण्याचे निमंत्रण दिले. श्री कालिकामातेने हे निमंत्रण स्विकारुन अवतार धारण केला आणि ती वेगाने कडापे येथे येऊ लागली. या वेगातच ती थोडे पुढे गेली. मात्र श्री बापुजीबुवांनी तिला जिथे होती तिथेच थांबायला सांगितले. त्यामुळेच सध्या श्री कालिकाईच्या मुर्तीचे तोंड वायव्येकडे आहे.

श्री बापुजीबुवांनी श्री कालिकाईला कडापे येथे कायमचे वास्तव्य करण्याची विनंती केली. श्री कालिकाईने ही विनंती मान्य केली मात्र तिने अट घातली की ती भूमिगत राहिल, श्री बापुजीबुवांच्या उजव्या बाजूला बसेल आणि भक्त तिच्या पूजेपूर्वी श्री बापुजीबुवांची पुजा करतील.

श्री बापुजीबुवांनी या अटी मान्य केल्या. आपण कडापे येथे प्रथम श्री बापुजीबुवांची पुजा करुन नंतर श्री कालिकाईची पुजा करतो याचे हेच कारण आहे.

श्री कालिकामाता ही कडापे येथे कायमच्या वास्तव्याला असल्यामुळे भक्तांमध्ये ती श्री कडापकरीण या नावानेही प्रसिद्ध आहे. श्री कालिकामात आपल्या सर्व दु:खांचे, अडचणींचे, समस्यांचे निवारण करते आणि आपल्याला सतत आनंदी ठेवते अशी सर्व भक्तांची श्रद्धा आहे.